आज काल पावसाला काय झाले आहे काय माहित? दिवसभर कडकडीत उन पडते आणि संध्याकाळी चार नंतर ढग भरून येतात आणि ऑफिस सुटायच्या वेळेला कडकडून वीज चमकतात. ढगांचा गडगडाट होतो आणि रिमझिम पावसाला सुरुवात होते मग मातीचा जो सुगंध पसरतो तो अवर्णनीय. पाउस मग चांगला तीन ते चार तास कोसळतो. सकाळी छत्री घेऊन निघावे तर स्वतःलाच विचित्र वाटते अगदी कडकडीत उन पडले असते आणि छत्री किंवा रेनकोट घेऊन काय निघणार? आणि पाउस पण फसवा गपचूप संध्याकाळी येतो आणि भिजवून टाकतो. गेले चार दिवस हेच होतेय. आज ऑफिस मधून येताना मित्राला म्हणालो, ‘अरे पावसाला काय झाले बघ न? कसा संध्याकाळीच कोसळतोय?’ तर तो म्हणाला अरे हा तर परतीचा पाउस…..

परतीचा पाउस ! हा शब्द ऐकल्यावर खूप वेगळेच वाटले. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी म्हटला तरी चालेल, हा शब्द ऐकला. लहानपणी जुन्या घरी चाळीच्या गॅलेरीत उभा राहून पाउस बघायचो तेव्हा  आईच्या तोंडून हे शब्द ऐकायचो. परतीचा पाउस, वळवाचा पाउस, नक्षत्राचा पाउस हे सगळे शब्द आईच्या तोंडून नेहमी ऐकायला मिळायचे. नंतर वयात आल्यावर हे सगळे माहित असल्यामुळे  आईला काही सांगायची गरज नाही पडायची. त्यामुळेच कदाचित हे शब्द कानावर यायचे बंद झाले. आज खूप दिवसांनी हा शब्द मित्राच्या तोंडून ऐकल्यावर लहानपणीच्या सर्व आठवणी चाळवल्या.  आता मी त्या सगळ्या आठवणी इथे लिहित नाही. काही काही आठवणी फक्त मनातल्या मनात चघळायला छान वाटतात. इतरांबरोबर त्या शेअर केल्या कि जरा बेचव होतात. म्हणूनच जरा आता आठवणीत रमतो.