गेले दोन आठवडे वेळच नाही मिळाला. गणपती बाप्पा च्या तयारीतच सगळा वेळ निघून गेला. माझ्या जुन्या चाळीत आम्हा मित्रांनी चालू केलेला गणेशोत्सव असतो. यंदा चे बारावे वर्ष आहे. मला घरगुती गणपतीतला येणारी मजा माहीत नाही. पण सार्वजनिक गणपती मंडळात काम करण्याची मजा काही औरच. लोकमान्य टिळकांसारखा दुसरा नेता होणे नाही. घराघरातल्या गणेशोत्सवाला त्यांनी सार्वजनिक मंडळात आणले. त्या मागचा उद्देश काय तर सर्व थरातल्या लोकांनी एकत्र यावे वा आपले सन साजरे करावे. त्यांच्या विचाराची प्रचीती आज १०० वर्षानंतर ही येते.

आमच्या मंडळात तसे फक्त ३२/३५ सभासद आहेत. आम्ही स्वतःच वर्गणी काढून आमचा गणेशोत्सव साजरा करतो. तशा म्हटल्या तर आमच्या चाळीत ४० खोल्या आहेत (खर्या अर्थाने चाळ) पण आम्ही कोणाकडे वर्गणी मागायला जात नाही. आम्ही सभासद हि वर्गणी काढून गणेशोत्सव साजरा करतो. कधी गेलोच तर एरिया च्या नगरसेवकाकडे, आमदार किंवा खासदार कडे जातो. पुर्वी त्यांच्याकडून ५ हजार पर्यंत देणग्या यायच्या. पण नंतर सगळ्यांना आपापले बॅनर लावायची हौस यायला लागली. त्या दिवसापासून आमच्या मंडळाचे सभासद तिकडे फिरकणे बंद झाले. आम्हाला आमचा गणेशोत्सव आमच्या पारंपारीक पद्धतीने साजरा करायचा असतो. त्यावार कोण्या पक्षाची, राजकारणाची छत्रछाया नको असते. त्यामुळे वाढता खर्च मंडळाला जमत नसला तरी आमचा गणेशोत्सव एकदम मजेत जातो.

गणपती यायच्या आधीच दोन महिने पासून तयारी चालू होते. आमच्या मंडळात अलिखित असे दोन ग्रूप आहेत. तसे ते सर्वा मंडलामधे असतील मला माहीत नाही. एक ग्रूप हार्डवेअर वाला आणि दुसरा सॉफ्टवेअरवाले. हार्डवेअर वाले ग्रूप सगळी दणकट, मजबूत कामे करणारे जसे…बांबू आणणे, मंडपचे वासे बांधणे, मंडप बांधणे, ताडपत्री गुंडाळाने, कलर काढणे इ. आणि सॉफ्टवेअर टीम म्हणजे आतली सजवता करणे, वॉलपेपर लावणे, पोलिस व फायर ब्रिगेड च्या परवानगी काढणे, फुलांची आरास करणे, देवाचे सामान आणणे, पूजेचे साहित्य आणणे इ. मी सॉफ्टवेअर ग्रूप मध्ये असतो. जरी दोन्ही ग्रूप वेगळे असले तरी सर्वा एकमेकांना मदत करतात.

सजावट

जेव्हा हार्डवेअर चे कामे चालू असतात. तेव्हा सॉफ्टवेअर वाले त्याना मदत करतात आणि तसेच हार्डवेअर वाले सॉफ्टवेअर वाल्यांना. हार्डवेअरा च्या ग्रूप मधे सहसा मोठी मुले असतात तर सॉफ्टवेअर मध्ये वयाचे बंधन नसते. अगदी पहिलीपासून ची मुले असतात. ही लहान मुले जरी प्रत्यक्षात काम करत नसली तरी छोटी कामे करत असतात. जसे, वॉलपेपर ला खल लावणे. कागद कापुन देणे इ. जो तो अगदी मनापासून काम करत असतो आणि आपापला वाटा उचलता असतो. गणपती यायच्‍या आधी दोन आठवडे तर खूपच धामधुमित जातात. शेवटचा आठवडा तर रात्री दररोज एक / दोन वाजे पर्यंत जागायचे आणि सकाळी सहा वाजता उठुन कामाला जायचे. दिवस निघून जातो.पण दुपारी जेवल्यानंतर जी काही झोप अनावर होतो. ती जराही सहन होत नाही. माग सारखे उठायचे आणि पाणी तोंडावर मारायचे. दोन वेळा चहा पियायची कशी बशी झोप घालवायची. रात्री परता जेवून कामाला लागायचे. मित्रांना शिव्या घालत, गर्लफ्रेंड च्या नावाने चिडवत, मोबाईल वार गाणी ऐकत कामे उरकायची. मध्ये मध्ये गणपती ची मूर्ती तयार झाली की नाही ते बघुन चक्कर टाकुन यायची. गणपती च्या आदल्या रात्री तर पूर्ण जाग्रनच होते. बाप्पा चे आगमन झाले की, बाकाची सजावट करायची. आणि जे झोपुन द्यायचे ते चतुर्थी च्या दुपारीच उठायचे. माग पहिली आरती करुन नेवेद्य खायचा आणि भरपेट जेवायचे.

बाप्पाला घरी आणताना

आमची चाळ, गितांजली मित्र मंडळाचा बॅनर

दुपारच्या आरत्या सोडल्या तर रात्रेची एक ही आरती चुकवायची नाही. कसे ही करुन ऑफिस मधुन निघायचे आणि ट्राफिक ला चुकवत आरती ला पोचायचे. आमचा गणपती पाच ते सहा दिवस असतो. गौरी गणपती बरोबर त्याचे विसर्जन होते. पण ते पाच ते सहा दिवस एवढे धम्माल असतात कि असे वाटते कि गणपती बाप्पा कायमचे इथेच राहावे. कधीच जाऊ नयेत.

पाच/सहा दिवसांनी जेव्हा बाप्पा चे विसर्जन होते त्यावेळेला खूप वाईट वाटते. आमच्या चाळीतली लहान मुले तर रडायची. आम्हाला हि खूप वाईट वाटायचे. पण पुढच्या वर्षी बाप्पा येणार आणि अजून धम्माल करणार हि आशा करूनच आम्ही रिकामा पाट घेऊन परततो.

गणपती बाप्पा मोरया…..पुढल्या वर्षी लवकर या……

गणपती गेले गावाला ….चैन पडेना आम्हाला…