एक छोटीशी प्रेमकथा

१५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.

आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची “राणी”. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.

तर अश्या जमान्यात राजा आणि राणी च्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर रानीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लास मधे आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की रानीचे क्लास च्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राजा आत येऊन जागेवर बसे पर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणी कडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, ‘ का रे? एवढा उशीर का झाला?’ राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा, ‘ काही नाही ग! असचं !”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणी च काही बोलता नव्हते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता.

तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुप मधे बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजाच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने राणी ची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघुना राजा ची स्वारी एकदम खुष होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राणी च्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणी ला सोडत सर्वात शेवटी राणी चे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहचायचो. एकदा का मैत्रीणी गेल्या की मग राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो. जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकां कडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंग च्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा.

आमच्या नजरे समोर त्यांचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणी ला तिच्या बिल्डिंग जवळ सोडून माझ्या घरी परतत होतो तेव्हा राजाने न राहवून मला विचारले, ‘ अरे यार ! आज काल मला कसे तरीच होते आहे. राणी ला घरी सोडले की जिव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोटस घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही…तिला पण असेच होत असेल का रे?’ मी म्हटले, ‘मित्रा! तुला बहुतेक प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया. आता घरी जा.’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीर च नाही झाला. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. २/३ महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजा ने डेरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. दोन दिवस तो चिठ्ठी घेउन तसाच फिरत होता. डेरिंग च होत नव्हती.

चवथ्या दिवशी तो क्लास मध्ये लवकरच आला. थोडा टेंशन मधे दिसता होता. मला वाटले की प्रपोझ करायचे आहे म्हणून टेंशन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, अरे यार! आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डींग खाली एक चक्कर मारुन आलो तर ती गॅलरी मधे दिसली पण तिने बघुन सुद्धा न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते रे!!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का?

मी म्हटले, ‘रिलॅक्स !!! शांत हो टेंशन नको घेऊस, ती आता क्लास ला येतेय का बघुया मग काय ते समजेल.’

आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसा बसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसुन राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाउन बसलो. तिच्या मैत्रीणी पण लांब जाउन बसल्या. राजा उठला आणि तिच्या जवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मुठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितली की ती तुझ्या साठिच आहे. राजा ने आपली चिठ्ठी तिच्या हाताता दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली. आणि माझ्या कडे बघुन तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला.

दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खुप खुश झालो. पण राणी च्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राजा कडे दोन मिनिटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्किलीने तिने हुंदका आवरला आणि राजा चा हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस रे! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. हमसुन रडायला लागली.

ती पाच सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकवुन गेली. ती म्हणाली, ‘माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापुरा ला जायचेय..” तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लास मधुन बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डींग खाली पोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहीले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’

ती म्हणाली, ‘सकाळीच सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघुन जावू.’ तसच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

राजा सायकल वर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवेलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.

पुढचे ४/५ दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला कि राजा शाळेत पणा नाही आला होता.. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाउन बघुया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतापणे चादर घेऊन गादी वर पडला होता. आई ने सांगितले, ‘अरे दोन दिवसापासुन तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही…पण दिवसरभर झोपुनच आहे.’ मी त्याच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून.

मी विचारले…काय झाले?

 ‘काही नाही रे… तुला माहीत आहे ना.’ राजा म्हणाला.

‘तू गेला होतासा का तिला सकाळी निरोप द्यायला?’…मी

‘हो गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागुनच बघत होतो. ती खूप शोधता होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंग कडे बघत होती तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेरिंग च नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होते’ ‘तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणी हात उंचावुन टाटा केला…तिने पण केला…डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दु:ख वाटतेय रे…मन नुसते तुटतयं, छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणुन कदाचित रागावली असेल ना रे?’

 सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजुला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, ‘उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरवात कर जरा बरे वाटेल’.

 राजा मग पुढे एक आठवडाच च क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघुन ढसाढसा रडायचा. तिची खुप आठवण यायची म्हणुन त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा चेहर्‍यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटूना गेला, म्हणाला, पुण्या पासून कोल्हापूर जवळ आहे, कधी तरी जाउन येइन. बघू नशिबात असेल तर भेट होईल.

 त्यानंतर तो कधी भेटलाच नाही. त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे नाही. राजा आणि राणी दोघे ही कधी मला भेटले नाहीत. आता भेटली तरी मला ओळखताही येणार नाही. त्यांना मला ओळखता येणार नाही. जर ते दोघे ह्या इंटरेनेट जाला वर असतील आणि माझा ब्लॉग चुकून वाचतील तर बरे होईल. माझ्याशी संपर्क तरी करतील. मी अजुन तिथेच राहतोय. कधी येऊन आवश्य भेटा.